ब्रेकिंग न्यूज


महाराष्ट्र

३५ वर्षांचा संघर्ष की राजकीय तडजोड?


३५ वर्षांचा संघर्ष की राजकीय तडजोड?

३५ वर्षे रयत संघर्ष मंचाच्या माध्यमातून कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांविरोधात सातत्याने संघर्ष करणारे डॉ. इंद्रजीत मोहिते आज अचानक भाजपाचे आ.अतुल भोसले यांच्या सहकार पॅनेलसोबत उभे राहिल्याने सभासदांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

३५ वर्षांचा संघर्ष की राजकीय तडजोड?

इंद्रजीत मोहितेंच्या भूमिकेमुळे सभासद संभ्रमात

ज्यांच्या विरोधात तीन दशके संघर्ष केला, त्यांच्याच पाठीशी उभे राहण्यामागचे नेमके कारण काय? सभासदांकडून स्पष्ट उत्तराची मागणी

पराग शेणोलकर 

कराड 

३५ वर्षे रयत संघर्ष मंचाच्या माध्यमातून कृष्णा सहकारी  साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांविरोधात सातत्याने संघर्ष करणारे डॉ. इंद्रजीत मोहिते आज अचानक भाजपाचे आ.अतुल भोसले यांच्या सहकार पॅनेलसोबत उभे राहिल्याने सभासदांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.


सहकाराचे गाड़े अभ्यासक डॉ.इंद्रजीत मोहिते एकेकाळी ज्या भोसले गटावर त्यांनी सातत्याने टीका केली, कारखान्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, सभासदांची दिशाभूल होत असल्याचा आरोप केला आणि कारखानदारी चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे सांगत लढा उभारला, त्याच गटाला आज पाठिंबा देण्यामागे नेमके कोणते राजकीय किंवा संघटनात्मक कारण आहे, हा प्रश्न सभासद विचारत आहेत.


डॉ. मोहिते यांनी अनेक निवडणुकांमध्ये स्वतःला सहकार क्षेत्राचे अभ्यासक, विचारवंत आणि पर्यायी नेतृत्व म्हणून सादर केले. परंतु आज त्यांच्याकडून भूमिकेत झालेला हा आमूलाग्र बदल अनेकांना अनपेक्षित वाटत आहे. दरम्यान, डॉ.मोहिते यांच्या यशवंतराव  मोहिते सहकारी पतसंस्थेच्या संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुमारे १२ हजार सभासद आणि ३५ कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या या संस्थेची आर्थिक स्थिती बिघडल्याची चर्चा आहे. संस्थेच्या व्यवहारांबाबत विविध आरोप झाल्यानंतर शासनाने लेखापरीक्षण प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जात आहे. अशा पार्श्वभूमीवर कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे सामना करण्याऐवजी सत्ताधारी गटासोबत जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत सभासद उत्तर मागत आहेत.

राज्यात सत्तेत असलेल्या आ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून या संस्थेला भविष्यात काही दिलासा किंवा संजीवनी मिळणार आहे का, अशीही चर्चा सभासदांमध्ये सुरू झाली आहे. या चर्चांना पूर्णविराम देण्याची जबाबदारी डॉ. मोहिते यांच्यावर असल्याचे मत व्यक्त होत आहे.


सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की, ३५ वर्षांचा संघर्ष हा तत्त्वांचा होता की परिस्थितीनुसार बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा? ज्या सभासदांच्या विश्वासावर संघर्ष उभा राहिला, त्याच सभासदांसमोर डॉ. मोहिते यांनी स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे की, कोणत्या अटी, कोणत्या कारणांमुळे आणि कोणत्या भूमिकेतून त्यांनी हा निर्णय घेतला. अन्यथा, तीन दशके उभारलेला संघर्ष, गेल्या अनेक वर्षांपासून दिलेला लढा आणि पर्यायी नेतृत्वाचा दावा हा इतिहासजमा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सभासद आता एकच प्रश्न विचारत आहेत – “३५ वर्षांचा संघर्ष व्यर्थ गेला का, की त्यामागे अजून काही अनुत्तरित सत्य दडले आहे?”

क्रमश: